माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलविला! ऐतिहासिक घटनेला ७३८ वर्षे पूर्ण !

पैठण- मुंजीसाठी शुद्धीपत्र मिळविण्याकरीता संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. या ऐतिहासिक घटनेला गेल्या रविवारी २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला ७३८ वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्यावतीने माऊलींचे ३४ वे वंशज अरुण जावळे यांच्याहस्ते रेड्याच्या मुर्तीस अभिषेक घातला. त्यानंतर परंपरेनुसार नागघाटावर वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

गोदाकाठावरील सर्वात प्राचिन घाट म्हणून नागघाट ओळखला जातो. हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे. नागडोह म्हणून महानुभवांच्या साहित्यात नागघाटाची नोंद आहे. याच नागघाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार करून दाखविला, संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंडे पैठण धर्मपीठाच्या अधिकारी मंडळीकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी नागघाटावर आले होते. तेव्हा एकाने ज्ञानेश्वरांना, तू जिवाशिवाचे तत्त्वज्ञान सांगतोस मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव असे आव्हान दिले. तेथून एक रेडा चालला होता.ज् ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते. या घटनेने नागघाटाचे महत्त्व आजही अबाधित आहे. कालांतराने त्याच ठिकाणी रेड्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून छोटेखानी मंदिर उभारण्यात आले.तेथे रविवारी, वसंत पंचमीच्या पर्वावर ‘माऊली’ चे ३४ वे वंशज अरुण जावळे यांच्या हस्ते रेड्याच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून वेदमंत्रोच्चारात विधीवत पूजा अर्चा केली. तसेच रवींद्र जोशी व गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले. ज्येष्ठ शिवसैनिक बंडेराव जोशी व सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख यांनी मनोगत व्यक्त केले. तर पैठण कुंभमेळा पुरोहित संघाचे अध्यक्ष वेदशास्त्रसंपन्न कमलाकर शिवपुरी व बापू गर्गे यांनी तत्कालीन शुद्धीपत्र आणि रेड्याने वदवलेल्या वेदाचे वाचन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top