मुंबई :
वांद्रातील माऊंट मेरी जत्रा १० सप्टेंबरपासून होणार असून रविवारी १७ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या माऊंट मेरी जत्रेला मुंबईसह उपनगरातून लाखो भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने बेस्ट प्रशासन वांद्रे रेल्वे स्थानकावरून २८७ अतिरिक्त बस सोडणार आहे.
माऊंट मेरी चर्च येथे तसेच फादर अंग्नल आश्रम या परिसरामध्ये जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठया प्रमाणावर असल्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक ते हिल रोड उद्यान दरम्यान या बस सोडण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वांद्रे परिसरातून नियमित बसमार्गावर देखील अतिरिक्त बस चालवण्यात येतील. या जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक आणि माऊंट मेरी चर्च या परिसरात भाविकांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.