नवी दिल्ली – ज्येष्ठ सिनेअभिनेते आणि तृणमूलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशात फक्त गोमांसच नाही, तर सर्व प्रकारच्या मांसाहारी अन्नावर बंदी घालावी, अशी मागणी केली. त्यासोबत समान नागरिक कायद्याच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
उत्तराखंड राज्याने २७ जानेवारीपासून राज्यात समान नागरी कायदा लागू केला आहे.या कायद्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, उत्तराखंडमध्ये हा कायदा लागू झाला आहे, तो कौतुकास्पद आहे. मात्र या कायद्यात अनेक पेच आहेत, ते दूर केले जावेत. समान नागरी कायद्यात अनेक घटकांची काळजी घ्यायला हवी. केवळ मतांसाठी हा कायदा लागू करत आहात, असे वाटायला नको. देशातही समान नागरिक कायदा लागू होणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की, प्रत्येक जण या कायद्याचे समर्थन करेल. मात्र, केवळ गोमांसच नव्हे, तर मांसाहारी पदार्थावरही देशभरात बंदी घालण्यात यावी. पण जे नियम उत्तर भारतात लागू करता येतील, ते ईशान्य भारतातील राज्यांमध्ये लागू करणे शक्य होणार नाही.