कोल्हापूर – कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणार्या महालक्ष्मी एक्स्प्रेस व कोल्हापूर-तिरुपती मार्गावर धावणार्या हरिप्रिया एक्स्प्रेसला दोन जादा डबे जोडण्याची घोषणा रेल्वेने केली. त्यानुसार कालपासून दोन जादा डबे वाढवले.मात्र, स्लीपरचे दोन डबे कमी करून त्याऐवजी हे दोन डबे वाढवले आहेत.त्यामुळे या दोन्ही एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणेच २१ डब्यांच्याच राहणार आहेत.त्यामुळे प्रवाशांची मात्र निराशाच झाली असून आता वेटिंगचे प्रमाण कायम राहणार आहे.
‘महालक्ष्मी’ व ‘हरिप्रिया’ एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी असते. यामुळे या दोन्ही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही मोठी असते. या गाडीला सध्या २१ डबे असून त्यात आणखी दोन डबे वाढवावेत,अशी मागणी सातत्याने होत आहे.तसेच या गाडीच्या जनरल डब्यांचीही संख्या वाढवावी, अशी मागणी आहे.या पार्श्वभूमीवर या दोन्ही गाड्यांना दक्षिण-मध्य रेल्वेने दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला. डबे वाढवल्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल,अशी शक्यता होती.मात्र,आता फोल ठरली आहे.या गाडीला असणार्या स्लीपरच्या ११ डब्यापैकी दोन डबे कमी करण्यात आले.त्याऐवजी एसई-१ आणि एसई-२ असे दोन जादा डबे जोडण्यात आले.यामुळे या दोन्ही गाड्या पूर्वीप्रमाणेच २१ डब्यांच्या राहणार आहेत. विशेष म्हणजे, या जादा डब्यांना स्लीपर क्लासचा दर्जा आणि तिकीट असल्याने रेल्वेने दोन डबे कमी करून जादा दोन डबे जोडून नेमके काय साध्य केले, अशी विचारणा प्रवाशांतून होत आहे.