महाराष्ट्र दिल्लीपुढेच झुकत चालला मविआ-युतीची दिल्लीला धावाधाव

मुंबई – महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी दिल्लीत अंतिम होते हेच चित्र गेल्या दोन दिवसात स्पष्ट झाले आहे. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी इथे कितीही बैठका घेतल्या तरी दिल्लीतून अंतिम मंजुरी घ्यावी लागते. महायुतीची यादी अंतिम करावी यासाठी ऐन निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना झाले. इकडे मविआचीही अंतिम यादी आलेली नसून काँग्रेसची दिल्लीत बैठक झाल्यावरच यादी अंतिम होणार आहे.
मविआ व मित्रपक्षाचे 33 उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. महायुतीची तीच स्थिती आहे. आज महत्त्वाचा दिवस सोडून मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे तिघे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली.
या बैठकीत अजित पवार गटाचे नवाब मलिक (मानखुर्द शिवाजीनगर) आणि सोलापूर दक्षिणचे भाजपाचे राम सातपुते यांना उमेदवारी द्यायची नाही असे ठरल्याचे सांगण्यात येते. दोन्ही उमेदवारांना भाजपाचा विरोध होता. मात्र नवाब मलिक यांची कन्या सना मलिक हिला अणुशक्तीवर नगर मतदारसंघात उमेदवारी द्यायची, असे निश्चित झाल्याचे कळते.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख पाच दिवसांवर आली असली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतिम जागावाटप काही जाहीर होताना दिसत नाही. जागावाटपासाठी काँग्रेसच्या नेत्यांच्या गेले काही दिवस दिल्लीत सतत बैठका चालू आहेत. तर महायुतीतील तिन्ही पक्षांनी काही उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना एबी फॉर्मही दिले आहेत. परंतु जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसल्याने आज पुन्हा महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वीही दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती.
अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये सकाळी पहिल्या सत्रात तीन तास बैठक झाली. या बैठकीनंतरही 22 जागांचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे दुपारी पुन्हा दोन तास बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांच्या पक्षाच्या जागांचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. नवाब मलिक आणि सना मलिक या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले होते. परंतु नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. भाजपाने त्यांच्या उमेदवारीलादेखील विरोध केल्यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारीवर काट मारण्यात आली आहे. त्यांच्या कन्या सना मलिक यांना मात्र अणुशक्तीनगर येथून उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
राम सातपुते यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पक्षातील अंतर्गत हेवेदावे यासारख्या काही कारणांमुळे राम सातपुते यांची विधानसभेतील उमेदवारी कापण्यात आली आहे.
अजित पवार यांच्यासह बैठक झाल्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतंत्र चर्चा केल्याचीही माहिती आहे. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांना महायुतीच्या कुठल्याही पक्षाचे बंडखोर उभे राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजुटीने निवडणुका लढवण्याचे आवाहनही
त्यांनी केले. एका बाजूला महायुतीचा जागावाटपाचा पेच सुटत नसताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागावाटपही रखडले आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून वाद असल्याने मविआच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासमवेत बैठका घ्याव्या लागल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या स्क्रिनिंग आणि निवडणूक समितीच्या बैठका पार पडल्या. अखेरीस काल तिन्ही पक्षांचे समसमान 85 जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. मात्र, 33 जागांवर निर्णय अजून झालेला नाही. त्यात विदर्भातील जागांचा समावेश असून, याबाबतीत काँग्रेस कुठलेही नमते घेणार नाही, अशी परिस्थिती असल्याने त्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीत बैठकांचे सत्र होणार आहे, अशी
चिन्हे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top