सातारा – दोन्ही संघटनेच्या वादात वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रखडली होती.अखेर त्याला मुहूर्त मिळाला असून यंदाची स्पर्धा अहिल्यानगरच्या मातीत रंगणार आहे.नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अहिल्यानगरला २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या दोन्ही संघटनांमध्ये खरी संघटना कोणाची यावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे २०२३ रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धा 29 जानेवारी ते दि. 2 फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच शहर व जिल्हा संघांनी शहर व जिल्हा कुस्तीगीर, तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात याव्यात, निवड चाचणीतून निवडलेल्या संघाची गादी व माती अशी वेगवेगळी प्रवेशिका संघाच्या लेटरहेडवरती खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापकांच्या नावासह २५जानेवारी पूर्वी मेलवर व किंवा पत्त्यावर पाठवावे, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आवाहन केले आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला २९ जानेवारीपासून सुरुवात
