महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राडा! शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली

अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे झालेली 67 वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा वादात सापडली. या स्पर्धेत आधी गादीच्या अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीत वाद झाला. या लढतीत पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करून पराभूत कुस्तीपटू शिवराज राक्षेने रिव्ह्यू पाहून लढत पुन्हा खेळवण्याची मागणी केली. त्यानंतर त्याने पंच दत्ता राणे यांना लाथ मारल्यामुळे मोठा गदारोळ झाला. त्यानंतर मानाच्या गदेसाठी झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ विरूद्धच्या लढतीत महेंद्र गायकवाडने ऐन लढतीत माघार घेतल्याने पुन्हा एकदा गोंधळ झाला. त्यानंतर अखेर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने पटकावली.
अहिल्यानगरच्या बलभीम अण्णा जगताप क्रीडांगणात माती आणि गादी विभागाचे अंतिम फेरीचे सामने होते. माती विभागात महेंद्र गायकवाड याने विजय मिळवला. मात्र, गादी विभागाच्या अंतिम फेरीत जोरदार राडा झाला. अंतिम फेरीत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेविरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीत मोहोळने राक्षेला पाठीवर खाली पाडताच पंचानी मोहोळ जिंकल्याचे जाहीर केले. त्यानंतर पराभूत राक्षे आणि त्याचे समर्थक भयंकर चिडले. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. माझे दोन्ही खांदे जमिनीला टेकले नाहीत. पंचानी चुकीचा निर्णय दिला. त्यामुळे मी पराभूत झालो नाही, असे राक्षेचे म्हणणे होते. त्याने रिव्ह्यू मागितला. पण पंचांनी नकार दिल्यामुळे राक्षे व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गेला. पण पंचांचा निर्णय अंतिम ठरला. यावेळी पंच दत्त राणे राक्षेशी बोलायला गेले असता संतापलेल्या राक्षेने त्यांना लाथ मारली. कुस्तीच्या इतिहासात पंचांना लाथ मारण्याचा प्रकार यापूर्वी कधी घडला नसल्याने स्पर्धेला गालबोट लागले. रिव्ह्यू घ्या. त्यात जर माझी पाठ जमिनीला लागल्याचे दिसले तर मी पराभव मान्य करेन, अशी मागणी राक्षेने कायम ठेवली. पण ती आयोजक तसेच पंचांच्या पॅनलने अमान्य केली. या सामन्यानंतर अनेक आजी-माजी कुस्तीगीरांनी पंचांच्या चुकीचा निर्णय बरोबरच. रक्षेने पंचांना लाथ मारण्याच्या कृत्यावरही कडाडून टीका केली.
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी
मानाची चांदीची गदा पटकावली

महाराष्ट्र केसरी किताबासाठी माती विभागातून विजेता ठरलेल्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि गादी विभागाचा विजेता पृथ्वीराज मोहोळशी अंतिम लढत झाली. मात्र या लढतीतही गोंधळ झाला. 10 मिनिटे रंगलेल्या सामन्यात महेंद्र गायकवाडने 2-1 गुणांनी मागे पडल्यानंतर मधेच सामना सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने नेमकी का माघार घेतली, हे कळले नाही. पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्यावर त्याच्या समर्थकांनी त्याला खांद्यावर उचलून घेऊन मैदानाला फेरी मारली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज मोहोळला मानाची चांदीची गदा दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top