मुंबई – देशभरातील राजकारणाचा गेल्या काही दिवसांपासून केंद्रबिंदू ठरत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार येत्या काही तासांमध्ये थंडावणार आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी जोर लावला होता. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अगदी अखेरच्या क्षणी एक अनपेक्षित खेळी खेळली. राज ठाकरे यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच निवडून आणा, अशी साद राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना घातली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरून सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच निवडून आणा, असे आवाहन केले आहे. यापूर्वी त्यांनी मराठीच उमेदवार निवडून आणा, असा संदेश दिला होता. मात्र आता त्यांनी यात सुधारणा केली. राज ठाकरे यांनी त्यांच्या नवीन संदेशात म्हटले की, सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथले सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच निवडून आणा
