३ सप्टेंबरला मतदान आणि निकाल
नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी ९ राज्यांतील राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील २ जागांचाही (पोटनिवडणूक) समावेश आहे. या सर्व जागांसाठी ३ सप्टेंबरला मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिसा या राज्यांत राज्यसभा निवडणुका होणार आहे. १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहेत, तर २१ ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. २२ ऑगस्टला अर्जची छाननी होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट आणि बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशात उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. भाजपाचे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभा निवडणुकीवर निवडून गेल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे.