यवतमाळ- माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करीत मते मागण्याचे भव्यदिव्य कार्यक्रम रोज होत आहेत. आज यवतमाळ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्राने याआधी कधी पाहिले नाही असे खेदजनक दृश्य पाहिले. मुख्यमंत्री शिंदे हे उंचावर उभारलेल्या स्टेजवरून रुबाबात चालत प्रेक्षकांवर गुलाबाच्या पाकळ्या उधळत होते. त्यांची ही चाल टिपण्यासाठी अर्धा डझन छायाचित्रकार समोरून त्यांचे फोटो काढत होते. मुख्यमंत्री आणि छायाचित्रकार यांच्यामध्ये येता कामा नये यासाठी दोन तरुण कमरेत वाकून हातातील कटोरीत फुलांच्या पाकळ्या घेऊन त्या मुख्यमंत्र्यांसमोर धरत गुलामांप्रमाणे एकेक पाऊल हळूहळू मागे टाकत होते.
आजवर पंतप्रधान मोदी यांच्या फोटोच्या कक्षेत इतर कुणी येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. आता मुख्यमंत्री शिंदेंच्या फोटोच्या कक्षेत कुणी येऊ नये म्हणून दोघा तरुणांना कमरेत वाकत कटोरा घेऊन चालायला लावले. पुरोगामी महाराष्ट्रात असे दृश्य पाहणेही क्लेशदायक आहे.
आज ‘लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा तीच भाषणे केली. योजना पुढे सुरू ठेवायची तर आम्हाला मते द्या, अशी मागणी तिघांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच्या रोखठोक शैलीत म्हणाले की, आम्ही आणलेल्या योजना पुढे चालवायच्या असतील तर विधानसभेत आम्हाला मतदान करून पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेवर आणावे लागेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते सत्तेवर आले तर माझ्या सर्व योजना बंद करतील. ते लाडकी बहीण योजना थांबवायला कोर्टातही गेले होते. पण मला माहीत आहे की, आम्हा भावांच्या मागे बहिणींचे आशीर्वाद आहेत. ज्याच्या पाठीशी ताई त्याचे कुणी बिघडवू शकत नाही.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सावत्र भावांपासून सावध राहा. जे खोडा घालण्याचा प्रयत्न करतील त्यांना जोडा दाखवा. बदलापूर प्रकरणात आम्ही कठोर पावले उचलत आहोत. त्यांनी मात्र बाहेरून माणसे आणून अराजक निर्माण करण्याचे कारस्थान केले.
आज यवतमाळचा कार्यक्रम भव्यदिव्य झाला. प्रचंड मोठे व्यासपीठ होते. पावसाचा धोका असल्याने भलामोठा मांडव घातला होता. सर्व महिलांनी फेटे घातले होते. सायंकाळपर्यंत भाषणे संपवून प्रातिनिधिक स्वरुपात दहा महिलांना लाडकी बहीण योजनेचे चेक देण्यात आले.
मंत्री संजय राठोड यांनी बदलापूर प्रकरणावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, कुठल्याही गोष्टीवरून राजकारण करणे, असा विरोधकांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या सरकारने सर्वसामान्यांसाठी एवढी सारी कामे केलीत की, विरोधकांकडे मुद्दाच नाही. त्यामुळे कुठला मुद्दा उचलायचा आणि राजकारण करायचे असा प्रकार सुरू आहे.
विरोधक कुठल्याही गोष्टीचे
राजकारण करतात! संजय राठोड
मंत्री संजय राठोड यांनी बदलापूर प्रकरणावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, कुठल्याही गोष्टीवरून राजकारण करणे, असा विरोधकांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या सरकारने सर्वसामान्यांसाठी एवढी सारी कामे केलीत की, विरोधकांकडे मुद्दाच नाही. त्यामुळे कुठला मुद्दा उचलायचा आणि राजकारण करायचे असा प्रकार सुरू आहे.