महाराष्ट्रात 70 लाख कसे वाढले? शिर्डीतील इमारतीत 7 हजार मतदार! राहुल गांधींचा संसद अधिवेशनात आरोप

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसद अधिवेशनात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालावर पुन्हा संशय व्यक्त केला . त्यांनी आपल्या भाषणात सवाल केला की महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक नंतर पाचच महिन्यात विधानसभा निवडणूक झाली . लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या पाच महिन्यात एकदम 70 लाख मतदार वाढले. शिर्डीत तर एकाच इमारतीत चक्क 7 हजार नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. याचे उत्तर दिले पाहिजे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, संविधानाने मतदानाचा हक्क दिला असला तरी आजकाल त्या हक्काचे रक्षण केले जात नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांत 70 लाख नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. इतक्या मतदारांची नोंदणी गेल्या पाच वर्षातही झाली नव्हती. जेथे भाजपा उमेदवार लोकसभेत मागे पडले होते त्या मतदारसंघात ही लोकसंख्या वाढली आहे. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला या आकडेवारीची माहिती मागत आहोत. मात्र ती आम्हाला दिली जात नाही. मी आरोप करत नाही. पण मला वाटते की यात काहीतरी समस्या आहे. आम्ही आयोगाकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकींची मतदार यादी मागितली आहे. या मतदारांची नावे, पत्ते व त्यांचे मतदान केंद्र ही आकडेवारी जर आम्हाला दिली तर आम्ही, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यावर संशोधन करू शकू. ही वाढ कशी झाली, त्याचा काय परिणाम झाला याचा विचार करता येईल.
याबरोबरच निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीचे नियमही बदलण्यात आले. आयुक्तांच्या निवडप्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाजूला करण्यात आले. आता लवकरच नव्या निवडणूक आयुक्तांची निवड होणार आहे. त्याच्या बैठकीला मी जाणार आहे. या बैठकीत मी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा
असतील. त्यांची दोन मते व माझे एक मत म्हणजे ते जे म्हणतील तेच होईल. मी बैठकीला जाऊनही उपयोग होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन नव्या आयुक्तांची निवड करण्यात आली. लोकसभेच्या तारखा बदलण्यात आल्या. सरकार एकएक करुन देशातील स्वायत्त संस्था आपल्या अधिपत्याखाली घेत आहे. त्यातून संविधानाचे रक्षण कसे होईल? राहुल गांधी पुढे म्हणाले की, राष्ट्रपतींचे भाषण लाँड्री लिस्ट आहे. आम्ही हे केले, आम्ही ते केले असे सांगण्यात आले. पण राष्ट्रपतींचे भाषण कसे असायला हवे असा मी विचार केला. देशातील तरुण देशाचे भवितव्य घडवतात. आम्ही बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकलेलो नाही. मग ते आमचे सरकार असो की भाजपाचे सरकार असो. देशातील सकल राष्ट्रीय उत्पादनात गेल्या दहा वर्षात घट झाली आहे. 2014 साली देशाचा जीडीपी 15.3 होता तो आता 12.6 टक्क्‌यांवर आला आहे.
देशातील मेक इन इंडिया योजना ही अयशस्वी झाली आहे. आपण म्हणतो की देशात मोबाईल फोनचे उत्पादन सुरु झाले आहे ते खोटे आहे. यातील सर्व भाग हे चीनमधून येतात व आपल्या देशात ते केवळ एकत्र जुळवले जातात. आपल्या देशातील तरुणांना सॉफ्टवेअर, इलेक्ट्रीक बॅटरी, रोबोट यांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. देशांतर्गत उत्पादन वाढले तरच देशाची प्रगती होऊ शकेल.
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात या तरुणांना दिशा द्यायला हवी होती. त्यांना प्रोत्साहित करायला हवे होते. त्याऐवजी त्यांनी केवळ हे केले ते केले याची जंत्री दिली. हे भाषण रटाळवाणे होते. आज चीन आपल्या देशात घुसला आहे. हे का झाले, कारण त्यांची औद्योगिक शक्ती मोठी आहे. आपल्याला वाटते की दोन देशांमधील युद्ध हे सैनिक त्यांच्या शस्त्रानिशी लढतात. मात्र खरे युद्ध हे देशाच्या औद्योगिक प्रगतीवर लढले जात असते. आपल्याला त्यासाठी तरुणांना तयार करायला हवे.
सायंकाळी मतदान कसे वाढले
कोर्टाचा आयोगाला सवाल

वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वाढलेल्या मतदानाबाबत न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर हे मतदान कसे वाढले याची माहिती दोन आठवड्यात सादर करा असा निर्देश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, प्रत्यक्ष मतदान व मोजलेले मतदान यात जिथे तफावत आढळली त्याची माहिती रिटर्निंग ऑफिसरने निवडणूक आयोगाला दिली का? हा आमचा सवाल आहे. ती माहिती आम्ही मागितली आहे.
पंतप्रधान पाहातही नाहीत
राहुल गांधी आपल्या भाषणात मतदारयादीचा विषय मांडत होते त्यावेळी ते थांबले व म्हणाले की, यातील सर्वात रंजक भाग म्हणजे हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की पंतप्रधान माझ्याकडे पाहतही नाहीत. आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की मी पंतप्रधानांचा विशेष आभारी आहे की ते माझ्या भाषणाला सभागृहात उपस्थित राहिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top