नागपूर – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील 7,645 कोटींच्या विविध प्रकल्पांच्या कामांचे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विकासकामांचे श्रेय घेत त्याची भरपूर वाखाणणी केली. त्याचवेळी हरियाणातील निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले की, आम्ही हरियाणा जिंकले. आता महाराष्ट्रात याहून मोठा विजय मिळवायचा आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज पायाभरणी केलेल्या प्रकल्पांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमिपूजन, नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची जंत्री देत ते म्हणाले की,आज महाराष्ट्राला 10 वैद्यकीय महाविद्यालयांची भेट मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या आणि शिर्डी विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारती प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात आले आहे. गेल्या वेळी मी महाराष्ट्रात आलो, तेव्हा 30,000 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला होता. यापूर्वीही हजारो कोटींच्या विकास योजना जिल्ह्या-जिल्ह्यांत सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक शहरांत मेट्रोचा आणि विमानतळांचा विस्तार केला जात आहे. हाय-वे प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहेत. राज्यात पायाभूत सुविधा, सौरऊर्जा आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजना सुरू केल्या जात आहेत. सर्वात मोठ्या वाढवण कंटेनर बंदराची यापूर्वीच पायाभरणी झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या वेगाने, इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रात कधीच विकास झाला नाही. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी माणसाचे दशकांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले. काँग्रेसच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला केवळ मागे नेण्याचे काम केले. म्हणूनच महाराष्ट्राने विकासाला प्राधान्य देऊन एकजूट दाखवून आगामी निवडणुकीत भाजपा आणि महायुतीलाच मतदान करायचे आहे. हरियाणा तर भाजपाने जिंकले आहे. आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे.
मोदी यांचे आजचे भाषण म्हणजे भाजपाने ’मिशन महाराष्ट्र’ सुरू केल्याचाच नमुना होते. सरकार महाराष्ट्राची कशी काळजी घेत आहे, हे सांगताना मोदी म्हणाले की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचा महायज्ञ केला आहे. आम्ही केवळ इमारती बनवत नाही, तर स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत. एका वेळी दहा नव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात म्हणजे केवळ दहा नव्या संस्था सुरू करणे नाही तर लाखो लोकांचे जीवन चांगले बनवणे आहे. मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) येथे सुरू होणारी मेडिकल कॉलेज या जिल्ह्यांच्या आणि आसपासच्या परिसरातील लाखो परिवारांच्या सेवेची केंद्र बनतील. या महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राच 900 मेडिकलच्या जागा वाढणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण मेडिकलच्या जागांची संख्या 6,000 होणार आहे. मेडिकलमध्ये 75,000 नव्या सीट निर्माण करण्याचा संकल्प या वर्षी मी लाल किल्ल्यावरील भाषणातून केला आहे. आजचा हा कार्यक्रम या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. आम्ही वैद्यकीय शिक्षणाला सोपे बनवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी संधीचे नवे दरवाजे उघडले आहेत. जास्तीत जास्त गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकारच्या शिक्षणासाठी मातृभाषेत पुस्तके नसणे, ही मोठी अडचण होती. आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ती दूर केली. आता महाराष्ट्रातील तरुण मराठी भाषेतून मेडिकलचे शिक्षण घेऊ शकतात. मोदी यांनी आपल्या भाषणात हरियाणा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसर्या वेळी जिंकून येणे ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी गँग लोकांना संभ्रमात टाकत आहे. काँग्रेसचे षडयंत्र उद्ध्वस्त झाले. काँग्रेसने दलितांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. पण दलित समाजाने त्यांच्या वाईट विचारांना दूर लोटले. त्यांना कळले की काँग्रेस त्यांचे आरक्षण काढून त्याच्या व्होट बँकेला देऊ इच्छित आहे. हरियाणातील दलित समाजाने भाजपाला विक्रमी समर्थन दिले आहे. ओबीसीही भाजपाबरोबर आहेत. काँग्रेसने शेतकर्यांना भडकावले, पण शेतकर्यांना माहिती आहे की त्यांच्या उत्पादनावर एमएसपी कोणी दिली?