महाराष्ट्रात मविआचा हरियाणापेक्षा मोठा पराभव होणार – शेवटच्या सभेत मोदींचे भाकीत

मुंबई – पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेवटची सभा आज मुंबईत शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची वाताहात झाली. त्यांच्या सगळ्या योजनांचा चक्काचूर झाला. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे जनतेने नाकारले. आता महाराष्ट्रातही महाविकास आघाडीची तशीच दारुण अवस्था होणार आहे.
मोदी पुढे म्हणाले की, मी अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीने सांगतो की, तुमचे केवळ महायुती आणि भाजपाच सेवाभावनेने काम करेन. तुमची स्वप्न हेच आमचे संकल्प आहेत. मोदी तुमची स्वप्ने जगतो. त्यांना पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करतो.
महायुती सरकारने केलेल्या मुंबईच्या विकासाचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, जगातील सगळे देश आपल्या शहरांना आधुनिक बनवत आहेत. तसाच महायुतीने मुंबईचा किती मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे हे तुम्ही बघितले आहे. लाखो कोटींच्या योजना आम्ही राबवल्या आहेत. मेट्रो, लोकल सेवा, पूल, महामार्ग, विमानतळ सगळ्याच बाबतीत तेजीने विकासकामे सुरू आहेत. याउलट स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने मुंबईसाठी कुठल्याही प्रकारच्या भविष्यकालीन योजना आखल्या नाहीत. त्यामुळे मुंबई मागे पडत गेली. काँग्रेसची वृत्ती मुंबईच्या स्वभावाच्या उलट आहे. मुंबईची वृत्ती इमानदारी, कठोर मेहनत आणि पुढे जायची आहे. तर काँग्रेसची वृत्ती भ्रष्टाचार, देशाला मागे नेणे, विकासात अडथळा आणणे ही आहे. त्यांनी अटल सेतू आणि मेट्रोला विरोध केला. डिजिटल इंडिया, युपीआय सारखे तंत्रज्ञान आले तेव्हा त्यांची खिल्ली उडविली. मुंबईत सर्व जातीधर्माचे लोक एकत्र राहतात. मात्र मविआला त्यांना आपसात लढवायचे आहे. मुंबई जोडणारे शहर आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांची आघाडी लोकांना तोडण्याचे काम करत आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईने अनेक वर्षे दहशतवाद्यांची भीती अनुभवली आहे. या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. आता हे सगळे बंद झाले आहे. कारण आता मोेदी सरकार आहे. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना ठाऊक आहे की, मुंबईवर हल्ला केला तर मोदी पाताळापर्यंत सोडणार नाही.
मुंबई हे बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे शहर आहे. मात्र एक पक्ष असा आहे ज्याने बाळासाहेबांचा अपमान करून काँग्रेसच्या हातात रिमोट कंट्रोल दिला आहे. मी त्यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसच्या राजपुत्राच्या तोंडून एकदातरी बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा वदवून घ्या. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे म्हणून घ्या. परंतु हे अजून झालेले नाही. हीच आघाडीची सच्चाई आहे. राहुल गांधी हे या दिवशी असे म्हणतील त्या दिवशी तुम्हाला चांगली झोप लागेल. हॉस्पिटलमध्ये जायची गरज लागणार नाही,
असेही मोेदी म्हणाले.
मोेदी महायुतीला निवडून देण्याचे आवाहन करत म्हणाले की, तुमच्या मतांची ताकद लक्षात घेऊन पुन्हा एकदा महायुतीला सेवेची संधी द्या. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीला तुमची साथ हवी आहे. मी महायुतीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आजची सभा केवळ प्रचाराची सभा नाही तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला महायुती सरकारच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी मी येथे उभा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top