पुणे – विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी-शहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाल्लीचा वंशज, या महाराष्ट्रातच त्यांची कबर बांधा, संघाने द्वेष शिकवला नाही, पण हे सत्तेसाठी वाटेल ते करू लागले आहेत. भाजपाने सत्ता जिहाद सुरू केला आहे, आता हाती मशाल घेऊन वणवा पेटवा, त्यांच्या पाठीवर इतके वळ काढा की जागा राहणार नाही. मुनगंटीवारांनी वाघनखे आणली, पण त्यामागे जो वाघ हवा तो आमच्याकडे आहे, असा घणाघात उध्दव ठाकरेंनी केला आणि निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
पुणे येथे शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत यांच्या पाठीवर वळ उमटले आहेत. त्यापेक्षा जास्त वळ आगामी विधानसभा निवडणुकीत उमटवा. इतके वळ काढा की, पाठीवर जागा शिल्लक राहणार नाही. भाजपावाल्यांना आज संघ नकोसा झाला आहे. अमित शहा अब्दालीचा राजकीय वंशज पुण्यात आला होता. त्यांनी आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला. हिंदुत्वाच्या विरोधात असलेले नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत ते आहेत. हे त्यांचे हिंदुत्व आहे का? बाळासाहेब देवरस यांना अपेक्षित असलेले हिंदुत्व मोदी शहांना मान्य आहे का? देवरस म्हणाले होते की, माणूस एकदा सत्तेच्या खुर्चीवर बसला की तो स्वतःसाठी आणि पक्षासाठी काम करू लागतो. तो जनतेसाठी कार्य करत नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले.
वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या राम मंदिराला आणि संसदेच्या इमारतीला पहिल्याच पावसाळ्यात गळती लागली. ज्याने संसदेचे कंत्राट घेतले होते तोच कंत्राटदार पुण्यामधील नदी बुजवत आहे. तुमचे सगळे गळते. पेपर लीक होत आहेत. तुमचे गळती सरकार आहे. त्यांनी पक्ष आणि माणसे फोडली आहेत. फोडाफोडी करून सत्ता मिळवली आहे. हा सत्ता जिहाद आहे. ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष केले. ते म्हणाले की, ‘मुंबईत
एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन’ असे म्हटले होते. त्यावर माझ्या नादाला लागू नका, असे फडणवीस म्हणाले. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणार्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिले जात नाही, ढेकूण चिरडायचा असतो. तुमच्या नादाला लागण्याएवढ्या किमतीचा तू नाहीच, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण, मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातो आहे. हा भाजपाला झालेला सत्तेचा विकार आहे. गद्दारांनी चोर बाजार मांडला आहे. पुणे, मुंबईत लूट सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या रुपाने पैसा ओरबाडत आहेत. हाच पैसा निवडणुकीत वापरणार आहेत. आमची शिवसेना म्हणजे भाकड जनता पक्ष नाही. अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे. या मशालीची जबाबदारी माझ्यावर दिली. तुम्ही शिवसैनिक माझे दूत आणि वकील आहात. घराघरात मशाल पोहोचवा. जनता आपली न्यायाधीश असून, आजपासून त्याची सुनावणी सुरू झाली. अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त
फडणवीसांचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत. त्यावर काय उत्तर देणार. अमित शहा यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचे म्हटले होते, तेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सिद्ध करत असल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे उद्धव ठाकरे दाखवून देत असल्याचे फडणवीस म्हणाले.