महाराष्ट्रात निवडणुका घोषित! एक टप्पा मतदान बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान! 23 ला मतमोजणी

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. महाराष्ट्रात बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. यावेळी मतदान अधिक व्हावे यासाठी लागून सुट्ट्या येणार नाहीत याची काळजी घेत बुधवारी मतदान ठेवले आहे. झारखंडला दोन टप्प्यांत मतदान असून, मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच होणार आहे. आजपासून दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल घोषित होतील, अशी माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असल्याने त्याआधी मतमोजणी होणे आवश्यक होते. विधानसभा निवडणूक पुढील वर्षी जानेवारीत होईल या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.
झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभेबरोबर आयोगाने पोटनिवडणूकही जाहीर केली आहे. देशातील 14 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक 9 मतदारसंघ उत्तर प्रदेशातील आहेत. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये 7, पश्चिम बंगाल 6, आसाम 5, बिहार व पंजाब प्रत्येकी 4, कर्नाटक 3, केरळ, सिक्कीम आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 2 आणि छत्तीसगड, गुजरात, मेघालय व उत्तराखंडमध्ये प्रत्येक एका मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला नोटिफिकेशन जारी केले जाईल. अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल. 28 ऑक्टोबरला अर्जांची छाननी तर 30 ऑक्टोबरला अर्ज घेण्याचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला याही सर्व जागांचे निकाल लागणार आहेत.
पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. यंदाही महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. त्यानंतर मतदान व मतमोजणी होऊन 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीबाबतही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला आहे. मतमोजणी महाराष्ट्राबरोबरच 23
नोव्हेंबरला होईल.
राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, काही दिवसांपूर्वीच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून, 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. 1 लाख 186 पोलिंग बुथ असतील. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. तर झारखंड राज्यात 24 जिल्हे असून 81 जागांवर दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. यातील 28 जागा या एसटी प्रवर्ग आणि 9 जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल 5 जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात 2.6 कोटी मतदार आहेत. यात 1.29 कोटी महिला तर 1.31 कोटी पुरुष मतदार आहेत. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाईन अ‍ॅपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांचा या विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या फुटीमुळे निर्माण झालेले दोन गट आणि मराठा आरक्षण याचा प्रभाव दिसणार आहे. त्याचबरोबर आता जागावाटपावरून मोठ्या घडामोडींची शक्यता आहे.

किती मतदान
एकूण मतदार – 9 कोटी 93 लाख
नव मतदार – 20 लाख 93 हजार
पुरुष मतदार – 4 कोटी 97 लाख
महिला मतदार – 4 कोटी 66 लाख
युवा मतदार – 1 कोटी 85 लाख
तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
85 वर्षांवरील मतदार – 12 लाख 48 हजार
शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार – 6 लाख 32 हजार

मतदानाची टक्केवारी
महाराष्ट्र टक्के
2004 – 63.44
2009 – 59.68
2014 – 63.38
2019 – 61.4

रश्मी शुक्ला राहणार?
विधानसभा निवडणूक निपक्षपाती होण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. रश्मी शुक्ला या सरकारच्या मर्जीतील अधिकारी असून, त्यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्ताधारी नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणाचा आरोप आहे. त्या 30 जून 2024 रोजी निवृत्त झाल्या आहेत. सरकारने त्यांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 3 वर्षांहून अधिक काळ एका जागी काम करणार्‍या आणि मुदतवाढ मिळालेल्या अधिकार्‍यांनी निवडणूक घोषित होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पदापासून दूर राहावे, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची बदली करावी अशी मागणी होती. परंतु त्यांना हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले की, रश्मी शुक्ला यांची नियुक्ती युपीएससीने केली असल्याने या बाबतीत तेच निर्णय घेऊ शकतील. याचाच अर्थ रश्मी शुक्ला पदावर कायम राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top