मुंबई- नववर्ष साजरा करण्यासाठी लोक घराबाहेर बाहेर पडतात आणि सर्वत्र गर्दी होते. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईसह राज्यातील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे हे निर्बंध आज २९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील.ही प्लॅटफॉर्म तिकीट विक्री मुंबईसह राज्यातील १४ रेल्वे स्थानकांवर बंद राहणार आहे.
प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे.त्यानुसार आज २९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहणार आहे.प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहणार्या रेल्वे स्थानकांमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर,लोकमान्य टिळक टर्मिनस,ठाणे, कल्याण,पनवेल,पुणे, नागपूर,नाशिक,भुसावळ, अकोला,सोलापूर, कलबुरगी आणि लातूर या महाराष्ट्रातील स्थानकांचा समावेश आहे.वयोवृद्ध व्यक्ती,ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती,लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने अशांना त्यातून सूट देण्यात येणार आहे.तरी वर्षअखेरीस आणि नववर्षाच्या प्रारंभी सुरळीत व सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.