पुणे :
राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गत वर्षी या सहाही विभागांत आजच्या तारखेपर्यंत एकूण ४५.२१ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन ४७.३० टक्के एवढा झाला आहे.
राज्यात जलसंपदा विभागाचे एकूण सहा विभाग आहेत. यात मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून २ हजार ९९७ धरणे आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) वगळता उर्वरित विभागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बहुतांश विभागांतील धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमध्ये आणखी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात इतर विभागांच्या तुलनेत सर्वात जास्त धरणे असून त्याची संख्या ९२० एवढी आहे. मात्र या विभागात जून महिना पावसाअभावी कोरडाच राहिला. तर जुलै महिना संपत आला तरीदेखील मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे. या विभागात सध्या १३.२७ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.