सोलापूर- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सोलापूरच्या मोहोळमध्ये पोहोचली. त्यावेळी सभेत अजित पवार म्हणाले की, पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांचे सर्व वीजबील माफ होणार आहे. राज्यात महायुती सरकार आणा, पुढील ५ वर्षे शेतकर्यांनो मोफत वीज मिळेल. काही योजना या कालबाह्य झाल्या आहेत म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली.
अजित पवार म्हणाले की, २००४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मी नवीन होतो. त्यावेळच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे विजबील माफ करायचे, असे म्हटले होते. शेतकऱ्यांची मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो, त्यानंतर काँग्रेसने विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले. लोकांनी विजबील माफीच्या नावाने आपल्याला मते दिली, तेव्हा लोक तोंडात शेण घालतील, असे मी म्हणालो होतो. मात्र तो निर्णय सुशीलकुमार शिंदे यांचा होता, असे विलासराव म्हणाले होते. शेतकऱ्यांचे वीजबील माफ करायचे हा चुनावी जुमला नाही. कालबाह्य झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत. मी मुंबईला राहत असलो तरी माझी शेती, पोल्ट्री आणि डेअरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख मी समजू शकतो. शेतकऱ्यांनी आता मागचे किंवा पुढचे वीज बील भरायचे नाही. पुढील १५ दिवसांत सर्व वीज बिल शून्य होणार आहे. महायुतीचे सरकार आणल्यास पुढील पाच वर्ष वीज बिल द्यावे लागणार नाही.
महायुती सरकार आणा! ५ वर्षे वीज मोफत! अजित पवार यांचे आश्वासन
