मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका 12 ऑक्टोबरला दसर्याच्या दिवशी किंवा त्याआधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळेच मविआ आणि महायुती या दोन्ही गटांनी उमेदवार निश्चिततेच्या प्रक्रियेला वेग आणला आहे. महाराष्ट्राच्या दौर्यावर असलेले भाजपाचे नेते अमित शहा यांनी आज दिवसभर महायुतीच्या नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर खलबते केली. त्याचवेळी मविआचे नेते आज तिसर्या दिवशीही पंचतारांकीत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये बसून जागावाटप अंतिम करत होते.
अमित शहा यांनी काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भाजपाच्या धोरणाबाबत प्रदिर्घ चर्चा केली. कोणते मतदारसंघ भाजपाला अनुकूल आहेत, कोणत्या मतदारसंघाची मागणी करायची, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अजित पवार गटाला कोणत्या जागा सोडायच्या याबाबत या दोघा नेत्यांनी रणनिती ठरविली. त्यानंतर आज सकाळी अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तिथे त्यांनी सर्वात आधी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या इतर नेत्यांशी दिवसभर चर्चा सुरू राहिली. उद्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी महायुतीचे 100 उमेदवार घोषित केले जातील, अशी चर्चा आहे. या उमेेदवारांबरोबरच महायुतीचा प्रचार सांभाळण्यासाठी प्रचारप्रमुखांची यादीही जाहीर करण्यात येणार आहे.
ही राजकीय चर्चा सुरू असतानाच प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे कारण काय होते किंवा भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे कळू शकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर नुकतीच शस्रक्रिया झाली आहे. शस्रक्रियेनंतर दुसर्या दिवशी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र या विश्रांतीच्या काळातही त्यांनी मुकेश अंबानी यांची भेट घेतली. त्याचवेळी त्यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यामुळे नेमक्या कोणत्या विषयावर अंबानी कुटुंबीय प्रमुख नेत्यांना भेटत आहेत याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर उद्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक होणार असून निवडणुकीच्या घोषणेआधी होणार्या या दुसर्या मंत्रिमंडळ बैठकीत कुणाचे भले केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीची ही निवडणुकीची लगबग सुरू असतानाच मविआचे नेते आज सलग तिसर्या दिवशी हॉटेल ट्रायडन्टमध्ये एकत्र आले. आजच्या बैठकीनंतर शरद पवार गटाचे जयंत पाटील म्हणाले की, येत्या 4 ते 5 दिवसांत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल. रोहित पवार म्हणाले की, जागावाटपाचे बोलणे अंतिम टप्प्यात आहे. 25 ते 30 जागांवर अजून चर्चा सुरू आहे. इतर जागांवर निर्णय झालेला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले की, नवरात्रीमध्ये मविआचे अधिकाधिक उमेदवार जाहीर केले जातील. राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना निवडणूक आयोगही कामाला लागले असून आज निवडणूक कर्मचार्यांना ठिकठिकाणी इव्हीएम मशीनचे प्रशिक्षण दिले गेले.