नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या दडपशाहीवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत भाजपाने विजय कसा मिळवला याचा पर्दाफाश मी दोन दिवसात करणार आहे.
ऑक्टोबरमध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक झाली. सगळे एक्झिट पोल भाजपा पराभूत होईल असा अंदाज वर्तवित असताना भाजपाने सत्ता टिकवली. एवढेच नव्हे तर भाजपाने आधीपेक्षा जास्त जागा जिंकून काँग्रेसला मोठा धक्का दिला. महाराष्ट्रातही असाच प्रकार घडला. महाराष्ट्रात महायुती आणि महा विकास आघाडीमध्ये चुरशी टक्कर होईल,असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात महायुतीची जणू त्सुनामी आली. महायुतीने २८८ पैकी २३२ जागा जिंकून महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला.हा निकाल विरोधकांनाच नव्हे तर सत्ताधाऱ्यांसाठीही धक्कादायक ठरला. महयुतीचा विजय ईव्हीएममधील छेडछाडीमुळे झाला असा आरोप सर्वच विरोधी पक्षांनी केला. त्यांनंतर राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या या इशाऱ्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.