महाबळेश्वर- महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील बाजारपेठेत अचानक अवाढव्य गव्याने मुक्त संचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याआधी सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विल्सन पॉईंट येथेही गव्याचा कळप बिनधास्तपणे फिरताना दिसून आला होता.
बाजारपेठेच्या रस्त्याने चालत निघालेला अवाढव्य गवा पाहून पर्यटकांना धडकी भरली. त्याच्या मागे कुत्री जोरजोरात भुंकू लागली. त्यामुळे या गवा रेड्याने सुभाषचंद्र बोस चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जावून पुढे जंगलात धूम ठोकली. गेल्या काही दिवसांपासून गवा, हरीण, भेकर आणि सांबर आदी रानटी प्राण्यांचा नागरीवस्तीत वावर वाढल्याचे दिसत आहे. कारवी ही जंगलातील वनस्पती गव्याचे आवडते खाद्य असते. जंगलातील कारवीचा यथेच्छ आस्वाद घेऊन हे प्राणी फेरफटका मारण्यासाठी मानवी वस्तीत येत असावेत, असा अंदाज बांधला जात आहे.