मुंबई – मुंबई महापालिकेच्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप युवा नेते अदित्य ठाकरेंनी केला होता. याप्रकरणी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामासह अन्य कामांमध्ये आणि निविदांमध्ये कोणताही घोटाळा झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
पालिकेने आपल्या प्रसिद्ध पत्रकात सांगितले की, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आरोपांना, महापालिका प्रशासनाने वेळोवेळी समर्पक उत्तरे दिली असून या कामांवर उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकांचे निरसन केले आहे. रस्ते कामांसाठी, मुंबई महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार सदर निविदा मागविल्या आहेत. तसेच त्यामध्ये सर्व नियमांचे पालन करून कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याबाबतचे सविस्तर विवेचन या स्पष्टीकरणांमध्ये व पत्रोत्तरांमध्येदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही, पत्राला उत्तर दिले जात नाही, या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. सुमारे ४०० कि.मी. लांबीचे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणातील निविदा मागवल्या आहेत. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महामार्गांचे काम केल्याचा अनुभव असणा-या संस्था या निविदांना प्रतिसाद देण्यासाठी पात्र होत्या. निविदाकारांकडे पुरेशी यंत्रसामुग्री असणे, मनुष्यबळ असणे, तांत्रिक कर्मचारी असणे आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे काम केल्याचा अनुभव असणे अपेक्षित होते. हे साध्य करण्यासाठी संयुक्त उपक्रम पद्धतीला परवानगी नव्हती,असे पालिकेने सांगितले.