पुणे- राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सरू आहे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. अमेरिकेमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याचे पंतप्रधान मोदी खुलेआम समर्थन करत आहेत. ही देशाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे बाबा आढाव यांनी सांगितले.
वयाच्या ९५ व्या वर्षांत पदार्पण केलेले बाब आढाव म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक पाहत आलो. बराच काळ त्याचा भागही होतो. पण आता सुरू असलेला भ्रष्टाचार यापूर्वी कधीही पाहिला नाही. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे. मतदान सुरू होण्याआधी आणि मतदान होताना कोट्यवधी रुपये मध्यस्थ आणि मतदारांना वाटले गेले. निवडणूक आयोगाने जी रोख रक्कम आणि वस्तू पकडल्या त्याचे जाहीर केलेले अधिकृत आकडेही शेकडो कोटींच्या घरात आहेत. याविरूध्द आत्मक्लेश करणार आहे .