जयपूर – राजस्थानच्या गेहलोत सरकारने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सार्वजनिक सुट्टीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंजुरी दिली. आतापर्यंत केवळ फुले जयंतीला ऐच्छिक सुट्टी दिली जात होती. मात्र, या निर्णयानंतर आता ही सुट्टी राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळली जाणार आहे.
महिला आणि बाल विकास मंत्री ममता भूपेश, राष्ट्रीय फुले ब्रिगेड यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्याची मागणी करणारी पत्रके दिली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे गेहलोत सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे.
यापूर्वी गेहलोत सरकारने २८ जानेवारी रोजी भगवान देवनारायण जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आता राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या ३० आणि ऐच्छिक सुट्ट्यांची संख्या २० झाली आहे. दरम्यान, फुले यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून, फुले यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे