जळगाव – गिरीश महाजनांकडून मला सतत फोन येत आहेत, पण मी माघार घेणार नाही, असे वक्तव्य भाजपाचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी केले आहे. जळगाव शहर मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बंडखोरी करत भाजपाचे डॉ. अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अश्विन सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सतत निरोप येत आहेत. पण मी त्यांची माफी मागतो. मी कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असे डॉ. सोनावणेंनी म्हटले.
भाजपाचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. निवडणुकीत फक्त काम करून घेतले जाते. त्यानंतर पाच वर्षे त्यांना विचारले जात नाही. मी याच कारणामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. गेल्या दहा वर्षांत जळगाव शहराचा अजिबात विकास झालेला नाही. त्यामुळे जळगावकरांच्या मनात आमदारांविषयी रोष आहे. लोक बदल करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास आहे.