प्रयागराज – उत्तर प्रदेश प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात लाखोंच्या संख्येने साधू, संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत. याच महाकुंभ मेळाव्यात आज संध्याकाळी ४:३०वाजताच्या सुमारास आग लागली. शास्त्री पुलाच्या सेक्टर १९ मध्ये गीता प्रेसच्या तंबूला आग लागली. या तंबूत ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर या ठिकाणी अनेक सिलिंडरचा एका मागून एक असा स्फोट झाले आणि आग लागली . प्रशासनाने नागरिक आणि संतांना बाहेर काढले. या आगीत २० ते २५ तंबू आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या दलाच्या १२ -१५ गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून ही आग २० मिनिटात आटोक्यात आणली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्य केले. आग विझवल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की, सेक्टर १९ मध्ये गीता प्रेसच्या तंबूला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक व्यक्ती जखमी झाला. आगीचे कारण तपासले जात आहे. तपासणी केल्यानंतर आम्ही किती नुकसान झाले याची माहिती देऊ.
अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक भानू भास्कर म्हणाले की, सेक्टर १९ मध्ये २ ते ३ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे ही आग लागली. सर्व लोक सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
महाकुंभ मेळाव्यात आग तंबू आणि साहित्य जळून खाक
