प्रयागराज – प्रयागराजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती गुप्तहेर संघटनांनी दिल्यानंतर सुरक्षेचे अनेक उपाय करण्यात आले असून त्याची रंगीत तालीमही आतापासूनच सुरू झाली आहे. महाकुंभ काळात कठोर तपासणी केल्याशिवाय कोणालाही प्रयागराजमध्ये प्रवेश दिला जाणार नसून यात्रेकरुंना सीमेवर थांबवण्यासाठीही विशेष सोय करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाकुंभाच्या काळात कोणीही व्यक्ती, वाहन वा वस्तूची पूर्ण तपासणी केल्याशिवाय प्रयागराजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार असून स्थितीवर ड्रोनच्या सहाय्यानेही लक्ष ठेवले जाणार आहे. सुरक्षेसाठी मध्य प्रदेशातील सतना, रेवा या शहरांमधील सीमांबरोबरच वाराणसी, कानपूर, लखनौ या शहरातही तपासणी नाके तयार करण्यात येणार आहेत. गस्ती, सीसीटीव्ही व तपासणी नाक्यांची रंगीत तालीम या महिन्यापासूनच सुरू झाली आहे. एनएसजी कमांडो, श्वान पथक व इतर पथकांद्वारेही सुरक्षा कडे तयार करण्यात येत आहे. प्रयागराजला लागून असलेल्या जिल्ह्यातील सीमांवर यात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी इथे तात्पुरते निवारे तयार करण्यात येणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभसाठी कोट्यवधी अधिक यात्रेकरू येतील,अशी शक्यता वर्तवली जात आहे.