प्रयागराज- प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभातील तिसरे आणि शेवटचे अमृतस्नान आज वसंत पंचमीच्या दिवशी पार पडले. यावेळी विविध आखाड्यांच्या, नागा साधूंच्या बरोबरीने २ कोटी भाविकांनी संगमावर अमृतस्नान केले. या अमृतस्नावार मौनी अमावस्येच्या दिवशी दुसर्या अमृतस्नानाच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरचे सावट असतानाही सर्वसामान्य भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज पहाटे अमृतस्नानाला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्येने साधू आपापल्या मानमरातबासह अमृतस्नानात सहभागी झाले. विविध आखाड्याचे नागा साधूही आपल्या मानाप्रमाणे संगमावर स्नानासाठी दाखल झाले. काही साधू घोड्यांवर बसून तर काही हातात तलवार-गदा, डमरू आणि शंख घेऊन हर हर महादेवचा जयजयकार करत संगमावर आले होते. सर्वप्रथम पंचायती निरंजनी आखाड्याचे संत संगमात पोहोचले. त्यानंतर किन्नर आखाड्याने सर्वात मोठ्या जुना आखाड्यासह अमृत स्नान केले. यावेळी हेलिकॉप्टरमधून संगमवर २० क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला.
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाकुंभमेळ्यात ६० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले होते. तर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी १०० हून अधिक नवीन आयपीएस अधिकारीदेखील तैनात केले होते. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकाही तैनात होत्या. हेलिकॉप्टरगर्दीवर नजर ठेवून होती. लखनौ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. योगी स्वतः पहाटे ३ वाजल्यापासून पोलीस महासंचालक, गृह प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह देखरेख ठेवून होते.