प्रयागराज – प्रयागराज मध्ये सुरु असलेल्या महाकुंभ पर्वात दर तासाला तब्बल तीन लाख भाविक संगमावर स्नान करतात. प्रशासनाने ही माहिती दिली आहे. काल संगमावर महत्त्वपूर्ण आखाड्यांच्या अमृतस्नानानंतर सर्वसाधारण भाविकांची गर्दी झाली. त्यांनी आखाड्यासाठी तयार करण्यात आलेले बॅरिकेड तोडून टाकले होते.महाकुंभच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आखाड्याबरोबरच कल्पनिवास येथे महाकुंभासाठी वास्तव्य करून असलेल्या साधू संतांनी स्नान केले. याबरोबरच देशोदेशीहून आलेल्या नागरिकांनी स्नान केले. संगमासह नद्यांच्या विविध घाटांवरही लोकांनी पवित्र स्नान केले आहे. गेल्या तीन दिवसात पाच कोटी लोकांनी स्नान केल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रयागराजमध्ये जागोजागी लोकांची गर्दी दिसत असून विविध अध्यात्मिक कार्यक्रम सुरु आहेत. साधूसंत, आखाडे, साध्वी यांच्याबरोबरच देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांमुळे प्रयागराज हे सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर झाले आहे. कल्पवासमध्ये सध्या १० लाख लोकांनी मुक्काम केला आहे. काली मार्ग, बंधारा तसेच सर्व पादचारी पुलांवर सध्या मुंगीला शिरायलाही जागा नाही. सर्वत्र भाविक हर हर महादेव व माँ गंगेचा जयजयकार करत फिरत आहेत. प्रयागराजमध्ये सध्या कडाक्याची थंडी असूनही भाविकांचा मोठा उत्साह असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या गर्दीत वाहने जाऊ शकत नाहीत म्हणून पोलीस घोड्यावरुन गस्त घालत आहेत.
महाकुंभात तासाला ३ लाख भाविकांचे संगमावर स्नान
