प्रयागराज -महाकुंभाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पौष पौर्णमेच्या पहाटे आज लाखो भाविकांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. कडाक्याची थंडी, दाटलेले धुके या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी असीम श्रद्धा व उत्साहात हे स्नान केले. आज संगमावर जवळजवळ ६० लाख भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.आज पहाटेपासूनच या स्नानांना सुरुवात झाली. संगमस्थळापासून ते निद्रिस्त हनुमान मंदिरापर्यंत सर्वत्र मोठा जनसागर दिसत होता. भाविकांनी संगमाच्या तीरावर जप, तप, ध्यानधारणा व अनुष्ठाने केली.पूजा सामुग्री, प्रसाद, चुनरी व दिवे विकणाऱ्यांचीही एकच गर्दी झाली होती. या वर्षी मोठ्या प्रमाणावर विदेशी नागरिकही सामील झाले होते. अनेक देशाच्या नागरिकांनी यावेळी सनातन धर्म व संन्यास स्वीकारला. त्याचे विधीही आज संगमावर सुरु होते. दक्षिण कोरियाच्या अनेक युट्यूबर्सनी या महाकुंभाचे चित्रीकरण केले. त्यांची गर्दीही लक्ष वेधून घेत होती. जपानी पर्यटकही जागोजागी स्थानिक मार्गदर्शकांकडून महाकुंभाचे महत्त्व समजून घेत होते. प्रयागराजच्या संगमस्थळाबरोबरच विविध घाटांवरही स्नान सुरु होते. कल्पवासियांनी मोक्षदायिनी संगमावर पवित्र स्नान केले. त्यानंतर आपल्या ४५ दिवसीय एकांतवासाला आरंभ केला. उद्या प्रयागराजला पहिले अमृतस्नान होणार आहे. महाकुंभाच्या ४५ दिवसांमध्ये २ लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाविकांच्या सुरक्षेचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून नदीच्या खोल भागाला जाळ्या लावण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षक बोटीही तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांचे संगमावर स्नान
