वॉशिंग्टन – जगातील सर्वात शक्तिशाली म्हणवल्या जाणाऱ्या एलन मस्क यांच्या कंपनीने तयार केलेल्या स्टारशिप या रॉकेटची आठवी चाचणी अशयस्वी झाली आहे. आज भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता टेक्सासमधील बोकाचिका येथून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणानंतर ७ मिनिटांनी त्याचा खालचा भाग म्हणजेच बूस्टर वेगळा झाला आणि तो लाँच पॅडवर परतला. तरी वरच्या भागातील इंजिनांनी काम करणे थांबवल्याने ही चाचणी यशस्वी झाली नाही असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.स्टारशिपचे प्रक्षेपण झाल्यानंतर रॉकेटच्या सहा इंजिनांपैकी वरच्या भागातील ४ इंजिनांनी काम करणे थांबवले. त्यामुळे जहाजाचे नियंत्रण सुटले. यानंतर ऑटोमेटेड अबॉर्ट प्रणाली सक्रिय करण्यात आली ज्यामुळे जहाजाचा स्फोट झाला. स्टारशिप अंतराळयान आणि सुपर हेवी रॉकेट यांना एकत्रितपणे ‘स्टारशिप’ असे म्हटले जाते.सोशल मीडिया साइट X वर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये, फ्लोरिडा किनाऱ्याजवळील लोकांनी आकाशात अंतराळयान तुटल्याचे वृत्त दिले. ढिगारा पडल्याने मियामी, ऑर्लँडो, पाम बीच आणि फोर्ट लॉडरडेल येथील विमानतळांवरील उड्डाणे विस्कळीत झाली.यापूर्वी १७ जानेवारी रोजी स्टारशिपची सातवी चाचणी देखील पूर्णपणे यशस्वी झाली नव्हती. प्रक्षेपणानंतर ८ मिनिटांनी, खालचा भाग वेगळा झाला आणि लाँच पॅडवर परतला, परंतु ऑक्सिजन गळतीमुळे जहाजाचा स्फोट झाला.
मस्क यांच्या स्टारशिपचीआठवी चाचणी अयशस्वी
