मुंबई – शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत ताक सुद्धा फुंकून प्यायचा निर्णय घेतला आहे. २ वर्षांपूर्वी पक्षात झालेल्या बंडावरून धडा घेतलेल्या शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची व्युहरचना काळजीपूर्वक करायला सुरुवात केली आहे.ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपले मशाल चिन्ह किंवा मशालीशी साधर्म्य असणारे चिन्ह दुसऱ्या पक्षाला देण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन वर्षांपूर्वी खूप मोठी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला. तसेच उद्धव ठाकरे यांच्याजवळ असलेले मुख्यमंत्रिपददेखील गेले. यानंतर शिवसेना फुटीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. सु्प्रीम कोर्टात या प्रकरणी अजूनही अंतिम सुनावणी संपलेली नाही. पण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे नाव देण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी मशाल चिन्ह देण्यात आले होते. आता याच चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगात ही महत्त्वाची मागणी केली आहे.
निवडणुकीत दोन उमेदवारांचे चिन्ह हे एकमेकांच्या साधर्म्याचे राहिले तर मतदारांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मतदाराला हव्या असणाऱ्या उमेदवाराला मतदान करता येत नाही. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह होते. तर काही उमेदवारांचे तुतारी चिन्ह होते. तर काहींचे पिपाणी चिन्ह होते. त्यामुळे आपल्या उमेदवारांना फटका बसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची विनंती मान्य करत यापुढे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य साधणारे चिन्ह कोणत्याही उमेदवाराला देणार नसल्याचे म्हटले आहे. त्याची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनही तशीच विनंती निवडणूक आयोगात करण्यात आली आहे.