मुंबई – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातील घडामोडी वेगाने घडत आहेत. तरीही मविआची अंतिम यादी तयार होत नाही. आज मविआची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार होती ती रद्द करण्यात आली. गेले दोन दिवस हाच प्रकार सुरू आहे. तिकडे भाजपा आणि शिंदे गटाने पहिल्या उमेदवार याद्या जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात जुन्या शिलेदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सुनील टिंगरे, नवाब मलिक, मयत बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान यांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही.
वडगाव शेरी येथील विद्यमान आमदार सुनील टिंगरे, फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार नवाब मलिक यांचे नाव अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत नाही. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असल्याने नवाब मलिकांच्या नावाला भाजपाचा विरोध आहे. त्यांची कन्या सना मलिक हिला उमेदवारी देण्याचा पर्याय आहे, पण त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. ज्यांची अलिकडेच हत्या झाली ते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचे नाव जाहीर न झाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श गाडीच्या हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर आरोपीशी संबंध असल्याने टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशनला धाव घेऊन पोलिसांवर दबाव आणला असा त्यांच्यावर आरोप आहे.
कालपासून विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
राज्यात चर्चेत असणार्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना संधी दिली. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजपाला रामराम ठोकून तिकिटासाठी शरद पवार गटात गेलेले हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे असा सामना तिसर्यांदा रंगणार आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवार गटाने मुस्लीम चेहरा देत नजीम मुल्ला यांना उमेदवारी जाहीर केली. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तगडे आव्हान देण्यासाठी मुद्दाम मुस्लीम चेहर्याची निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवळ विरुद्ध गोकुळ झिरवळ असा पिता विरुद्ध पुत्र सामना रंगणार आहे. गोकुळ झिरवळ सध्या कोणत्याच पक्षात नाहीत, मात्र ते सतत शरद पवार गटाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवतील अशी चर्चा आहे. दिंडोरी मतदारसंघ झिरवळ कुटुंबात राहावा यासाठी पिता-पुत्राने ही अजब खेळी
केली आहे.
बारामतीत काका-पुतण्या लढत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा लढवणार हे निश्चित झाले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. बारामतीत त्यांचे पुत्र पार्थ पवार लढतात का याकडे सर्वांचे लक्ष होते. अजित पवारच लढणार असल्याने यावेळीही पवार कुटुंबातच लढा होणार आहे. यावेळी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे, यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असाच सामना रंगणार आहे.
बारामती- अजित पवार, येवला- छगन भुजबळ, आंबेगाव- दिलीप वळसे पाटील, कागल- हसन मुश्रीफ, परळी- धनंजय मुंडे, दिंडोरी- नरहरी झिरवळ, अहेरी- धर्मराव बाबा आत्राम, श्रीवर्धन- आदिती तटकरे, अंमळनेर- अनिल भाईदास पाटील, उदगीर- संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले, माजलगाव- प्रकाश दादा सोळंके, वाई- मकरंद पाटील, सिन्नर- माणिकराव कोकाटे, खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील, अहमदनगर शहर- संग्राम जगताप, इंदापूर- दत्तात्रय भरणे, अहमदपूर- बाबासाहेब पाटील, शहापूर- दौलत दरोडा, पिंपरी- अण्णा बनसोडे, कळवण- नितीन पवार, कोपरगाव- आशुतोष काळे, अकोले – किरण लहामटे, वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण- शेखर निकम, मावळ- सुनील शेळके, जुन्नर- अतुल बेनके, मोहोळ- यशवंत माने, हडपसर- चेतन तुपे, देवळाली- सरोज आहिरे, चंदगड – राजेश पाटील, इगतपुरी- हिरामण खोसकर, तुमसर- राजू कारेमोरे, पुसद -इंद्रनील नाईक, अमरावती शहर- सुलभा खोडके, नवापूर- भरत गावित, पाथरी- निर्मला विटेकर, मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला.