मुंबई – महाविकास आघाडीने आज मुंबईत सभा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर करीत लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी महिलांना दर महिना 3 हजार आणि बेरोजगार असलेल्या भावांना महिना 4 हजार रूपये देण्याची घोषणा केली. हे जाहीर करताना राहुल गांधी त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले की आमची सत्ता आली तर खटाखट खटाखट तुम्हाला पैसे मिळतील.
मविआकडून महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1,500 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट दुप्पट करण्याचे आश्वासन मविआने दिले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील महिलांना मोफत एसटी प्रवासाची घोषणाही केली आहे. महिलांसाठी या योजना जाहीर करून मविआने महायुतीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
इंडिया आघाडीच्या या सभेला काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. सभेत एकेका नेत्याने एकेका योजनेची घोषणा केली. राहुल गांधी महिलांसाठीच्या ’महालक्ष्मी’ योजनेची घोषणा करताना म्हणाले की, इंडिया आघाडी प्रत्येक महिलेच्या खात्यात 3 हजार रुपये प्रत्येक महिन्याला सरकार पाठवेल. महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये खटाखट, फटाफट, गटागट जमा होणार आहेत. भाजपच्या सरकारच्या काळातील महागाईचा त्रास, गॅस सिलिंडरच्या दराचा त्रास, बेरोजगारीचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये पाठवणार आहोत. महाराष्ट्रातील महिला बसमधून प्रवास करतील तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही. त्यांना मोफत प्रवास करता येईल.
इंडिया आघाडीच्या सभेत भाषण करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि संघ परिवारावर निशाणा साधला. ते म्हणाले, ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे भाजपा व संघ, दुसरीकडे इंडिया संघटन, एकीकडे प्रेम, आपुलकी, राज्यघटना, दुसरीकडे घटना कमजोर करण्याचा प्रयत्न भारताच्या संस्था, आरोग्य, शासकीय यंत्रणा यात आपले विचार लादायचे असे घटनेत कुठेही म्हटलेले नाही. उच्चपदांवर कार्यक्षमता पाहून नियुक्ती होत नाही.
केवळ संघाचे असाल तर पद मिळते. निवडणूक आयोगावर दबाव टाकतात, इडी, सीबीआयचा वापर करून सरकार पाडतात. मविआचे सरकार पाडले कारण त्यांना अदानी, अंबानीला मदत करायची आहे. धारावीची एक लाख कोटीची जमीन एका उद्योगपतीला देत आहेत. येथील उद्योग गुजरातला नेले ज्यात पाच हजार जणांना नोकर्या मिळाल्या असत्या. ते म्हणतात की महिलांना पैसे देतो. पण भाजपा सरकार पेट्रोल, डिझेल, सिलिंडर आदीची महागाई करून प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून महिना 90 हजार रुपये काढते. भाजपाने लघु आणि मध्यम उद्योग संपवून बेरोजगारी वाढवली. गरीब सर्वाधिक कर भरतो. गाडी घेतली, खाणे घेतले, कपडे घेतले तर कर भरावा लागतो. जातनिहाय जनगणना देशात का हवी, हेदेखील राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सांगितले.
शरद पवार यांनी घोषणा केलेल्या कृषी समृद्धी योजनेत, शेतकर्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार असून नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहेत. शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत आली तर कृषी क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडविले जातील. शेतकर्यांना कर्जमुक्त केले जाईल. मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा आम्ही 71 हजार कोटींचं कर्ज माफ केले होते. शेतकर्यांच्या शेतीला 12 टक्क्यांचे व्याज 6 टक्क्यांवर आणले होते. नंतर ते 3 टक्क्यांवर आणले होते.
उद्धव ठाकरे यांनी बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपये देण्याच्या योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की, तरुण नासला जात असेल तर त्याला उभारी देणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ही योजना राबवत आहोत.
25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधांची योजना मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केली.
महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
शेतकर्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.