नवी मुंबई – महायुती हा उगवता सूर्य आहे, तर महाविकास आघाडी सरकार आले तर ते महाराष्ट्राला अंधारात ढकलणार असल्याची टीका भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारसभेत जे.पी. नड्डा बोलत होते.
जे.पी. नड्डा म्हणाले की, महायुती असेल तरच महाराष्ट्राची गतिशील प्रगती होईल. उन्नती आणि विकास होईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महायुती आणि एनडीएने एक नवी संस्कृती, राजकारणाची नवी व्याख्या तयार केली आहे. आमच्या सरकार जे बोलले होते तेच झाले आणि जे बोलले नाही तेही झाले. महायुती हा उगवता सूर्य आहे, जो महाराष्ट्राला प्रकाश देईल. तर महाविकास आघाडी महाराष्ट्राला अंधारात ढकलणार आहे.
राहुल गांधी संविधानाचे पुस्तक घेऊन फिरत आहेत. त्यांनी राज्यघटनेचे पुस्तक वाचलेले नाही. ते फक्त हे पुस्तक घेऊन फिरत आहेत. कारण धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही,असे बाबासाहेबांनी संविधानात नमूद केले आहे. पण आज कर्नाटकात खासगी कंत्राटदारांना कंत्राट देताना काँग्रेस पक्ष मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देत आहे. आज तेलंगणात मुस्लिमांना एससी-एसटी-ओबीसींचे आरक्षण देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पक्ष संपवू, पण काँग्रेसशी तडजोड करणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र आज उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला – मांडी लावून बसले आहेत.एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेले. सत्तेसाठी वडिलांचे विचार बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे काँग्रेसशी तडजोड केली आहे, त्याबद्दल महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही.