मविआ-महायुतीत कोण किती जागा लढणार? हे अजूनही अस्पष्ट

मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची अंतिम तारीख काल संपली तरी गोंधळ अजूनही कायम आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोघांकडूनही सर्वच्या सर्वच २८८ जागांवर उमेदवार घोषित झालेले नाहीत. युती-आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी उमेदवारांची स्वतंत्र घोषणा केली असली तरी निश्चित आकडा कोणत्याही पक्षाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट होणार आहे.
महायुतीकडून भाजपा सर्वाधिक १५२ जागा लढवणार असून त्यातील ४ जागा त्यांनी आपल्या मित्र पक्षांना दिल्या आहेत. भाजपाने शिंदे गटाच्या वाट्याला मतदारसंघाततही आपले दहाहून अधिक उमेदवार घुसवले असल्याचे त्यांच्या उमेदवारांची संख्या अधिक झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने ८० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर अजित पवारांच्या वाट्याला केवळ ५२ जागा आल्या आहेत. अजित पवारांनी मित्र पक्षाचा विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, तर शिंदेंनीही खास विमानाने अजितपवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधात एबी फॉर्म पाठवले आहेत. सत्ताधारी महायुती एकूण २७६ जागांवर लढत असल्याचे स्पष्ट झाले असले तरी उर्वरित १२ मतदारसंघात नेमके कोण लढत आहे हे स्पष्ट झालेले नाही.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक १०४ जागांवर लढत आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ९० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ८७ उमेदवारांना तिकीट दिले आहे. राज्यातील ५ मतदारसंघात मविआचे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडी राज्यात एकूण २८१ जागांवर लढत असल्याचे स्पष्ट झाले असून इतर ७ जागांवर नेमके कोणाचे उमेदवार लढतील हे येत्या ४ नोव्हेंबरला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top