मुंबई – काही दिवसांपूर्वी आश्वासनांची पंचसूत्री जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या ’महाराष्ट्रनामा’ या सविस्तर जाहिरनाम्याचे आज प्रकाशन झाले. 48 पानांच्या या जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे. त्यात महिलांना वर्षाला 6 सिलिंडर, 300 युनिटपर्यंत वीजवापर असणार्या ग्राहकांना 100 युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला तीन लाखाची आर्थिक मदत, प्रत्येक मुलीच्या नावे बँक खात्यात 18 वर्षांनंतर 1 लाखाची रक्कम, सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना, अडीच लाख सरकारी पदांची भरती, महिला कर्मचार्यांना मासिक पाळीसाठी 2 दिवसांची ऐच्छिक रजा, सरकारी रुग्णालयात मोफत औषधे, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना यांचा समावेश आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी मविआने सर्वात भरगच्च असा हा जाहीरनामा जाहीर
केला आहे.
मुंबईतील नरिमन पाईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, प्रमुख प्रवक्ते प्रवन खेरा, खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत
उपस्थित होते.
मविआने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या पंचसूत्रीतील महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये आणि महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा, शेतकर्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ. नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंतची मदत, प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा, जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार या पाच गॅरेंटीचा महाराष्ट्रनाम्यातही समावेश आहे. याशिवाय मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे.
महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर, एमपीएसीचे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसांत निकाल, सरकारी नोकर्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुशेष भरणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार,
नवे औद्योगिक धोरण आखणार, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणार, राज्यात सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा, मुलांना सुविधा देण्यासाठी आढावा घेऊन लागू योजनांमध्ये सुधारणा करणार, सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविणार, शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार, रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांचे थकित मानधन व भत्ता देणार, जगभरातील मराठी आणि महाराष्ट्रातील परभाषिकांना मराठी भाषा शिकविण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रम सुरू करणार, महायुतीने रखडविलेल्या चैत्यभूमी, दादर (इंदू मिल) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांचे काम निश्चित मुदतीत करण्यासाठी कृती आराखडा करणार, महायुती सरकारने खासगी संस्था व व्यक्तींना भूखंड देण्याबाबत काढलेल्या आदेशांचा फेरविचार करणार, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना ’भारतरत्न’ प्रदान करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे करणार, महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार, महिलांसाठी’शक्ती’ कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार, महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि हाकेच्या अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार, आरोग्य, शेतकर्यांचे संरक्षण आणि हवामानबदलाचे संकट पेलण्यासाठी ’महाराष्ट्र मिलेट मिशन’ राबविणार, दूध उत्पादकांचा खर्च लक्षात घेऊन दरवर्षी दूध दर निश्चित करणार, कांदा आणि टोमॅटोला संरक्षण देत राज्यात गुलाबी आणि शेंदरी क्रांती आणणार, महाराष्ट्रासाठी नवे शैक्षणिक धोरण आणणार, पाच वर्षांत साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देणार, पाच वर्षांत साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देणार, पेपर फुटीविरोधातील कायदा आणखी कडक करणार अशीही अनेक वचने या जाहीरनाम्यात मविआने दिली आहेत.
महाराष्ट्रनाम्याच्या प्रकाशनावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपा युती सरकारला दीड वर्षात शेतकर्यांची आठवण आली नाही, पण आता त्यांना शेतकर्यांची आठवण आली असून कर्जमाफी करण्याच्या वल्गना करु लागले आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी दिसले नाहीत. आता त्यांना पराभव दिसत असल्याने यांची आठवण झाली आहे. आता भाजपा युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचे ठरवले आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही. हा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे.
मोदींनी पुन्हा शाळेत जावे
रेड बुकवरून खरगेंचा टोला
राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवल्यावर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देत असल्याची टीका केली आहे. त्याला आज मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचा फोटो दाखवून खरगे म्हणाले की, त्यांनी हे पुस्तक दिले तर संविधान आणि आम्ही हे केले तर शहरी नक्षलवाद कसा? पंतप्रधान मोदींनी पुन्हा प्राथमिक शाळेत जाणे आवश्यक आहे.