मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांत प्रत्येकी 85 जागा लढवण्यावर सहमती झाली असून उर्वरित 15 जागांवर अजून निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर इतर 18 जागांबाबत आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करून उद्या निर्णय घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार
परिषदेत सांगितले. काँग्रेसचे जास्त आमदार असल्याने काँग्रेस मोठा भाऊ आहे त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळतील, अशी चर्चा होती. मात्र तिन्ही पक्षांना समान जागावाटप झाली आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेच्या आधी उबाठाची 65 जणांची उमेदवारी यादी प्रसारित झाली. मात्र ही यादी अंतिम नाही, असा खुलासा संजय राऊत यांनी केला. मविआच्या जागावाटपांबाबत आज शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मविआच्यावतीने एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील, संजय राऊत आणि नाना पटोले उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, शरद पवार यांच्याबरोबर आज झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाबाबतचा वाद मिटला आहे.