इस्लामाबाद – पाकिस्तानची पहिली नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई हिने काल आपल्या गावाला भेट दिली. तालिबानींनी तिच्यावर २०१२ साली प्राणघातक हल्ला केल्यानंतरची तिची ही पहिलीच भेट होती. मलाला हेलिकॉप्टरने आपल्या खैबर पख्तूनख्वा च्या शांगला जिल्ह्यातील बरकाना गावी आली होती.मलाला हिने तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागात मुलींच्या शिक्षणाचे कार्य केल्याबद्दल तालिबानींनी त्यांच्यावर २०१२ साली हल्ला केला होता. त्यानंतर तिला ब्रिटनमध्ये नेण्यात आले व उपचारानंतर ती बरी झाली होती. तेव्हापासून तिने आपले शिक्षणाचे कार्य सुरु ठेवले असून तिला या कार्यासाठी नोबेल पारितोषिकही मिळाले आहे. काल ती अनेक वर्षांनी आपल्या घरी गेली. तिने या भागात २०१८ साली स्थापन केलेल्या शाळेलाही भेट दिली. यावेळी तिने येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या मुलींना आपल्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला तिने दिला. त्यानंतर ती आपल्या आजोळी व आपल्या पतीच्या गावीही गेली. त्यावेळी तिच्याबरोबर तिचे वडील व पतीही उपस्थित होते. मलाला फंडच्या माध्यमातून महाविद्यालयात विनामूल्य उच्च स्तरीय शिक्षण पोहोचवणार असल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर ती इस्लामाबादला परतली.
मलालाची अनेक वर्षांनी आपल्या गावाला भेट
