मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी कालच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान सहकार क्षेत्राच्या सद्यस्थितीवरून शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचा आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. अमित शहा हे महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी आणि मराठी माणसाचे खच्चीकरण करण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येतात, अशा शब्दात राऊत यांनी शहांवर हल्ला चढवला.
अमित शहा यांचा जन्मदेखील झाला नव्हता तेव्हापासून महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली गेली आहे. आजही सहकाराच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. शहांना त्याबद्दलची काही माहिती असल्याचे दिसत नाही. ते केवळ महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या आणि येथील मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याच्या खुनशी हेतुने वारंवार महाराष्ट्रात येत असतात. आपण देशाचे गृहमंत्री आहोत याची शहांना काडीचीही जाणीव नाही. अन्यथा पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात येऊन येथील नेत्यांचा अपमान करण्याऐवजी ते दीड वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरला गेले असते, असे राऊत म्हणाले.
शहा यांच्याकडे सहकार खातेही आहे. त्यांनी त्या पदाचा वापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्यासाठी केला. साखर कारखान्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, ईडी-सीबीआयची भिती दाखवायची आणि पक्षाशी गद्दारी करायला भाग पाडायचे हाच उद्योग शहा करत आहेत. अजित पवार , एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले गद्दार नेते हे त्याचे ताजे उदाहरण आहे. शहांनी या लाचारांना ईडी-सीबीआय़चा जमालगोटा दाखवताच हे सारे शेपूट घालून भाजपाला शरण गेले. खरेतर शहा यांच्या हाती सहकार खाते आल्यापासून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला घरघर लागली आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे कंबरडे मोडून ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त करण्याचा शहांचा कुटील हेतू आहे,अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.