अहमदनगर – मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याबाबत सुरू झालेले आंदोलन आज सुरू राहिलेले असतानाच ओबीसी संघटनांनी या आरक्षणाला विरोध करण्याची घोषणा केली. त्यातच आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे आला आहे. आज सोलापुरात धनगर आरक्षण मागणीचे निवेदन देताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यावर कार्यकर्त्याने भंडारा उधळल्यावर मारहाण झाली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस होता. आज त्यांच्या मातोश्री त्यांना भेटायला आल्या होत्या. त्यावेळी वातावरण भावुक बनले होते. एक दिवसानंतर आपण सलाईनही लावू देणार नाही, असे जाहीर करीत आंदोलनाला गालबोट लावू नका, असे आवाहन त्यांनी केले. आज त्यांचे 21 सदस्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला मुंबईत दाखल झाले.
राज्यात मराठा आरक्षणावर चर्चा वेग घेत असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीचा कार्यकर्ता शेखर बंगाळे यांनी सोलापूरच्या विश्रामगृहात धनगर आरक्षण बाबत निवेदन देताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यावर भंडारा उधळला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या दोन सुरक्षारक्षक तसेच पालकमंत्र्यांसोबत असलेले शेखर बंगाळे यांना निवेदन देण्यासाठी घेऊन गेलेले भाजपाचे शहराध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते नरेंद्र काळे यांनी भंडारा उधळणारा कार्यकर्ता शेखर बंगाळे याला पालकमंत्र्यांसमोरच बेदम मारहाण केली. विखे-पाटील यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पवित्र भंडार्याची माझ्यावर उधळण झाली त्याचा आनंद आहे. प्रतिकात्मक गोष्टी करण्याची कार्यकर्त्यांची भावना असते. ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचे निर्देश मी दिले आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना शेखर बंगाळे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला सुद्धा काळे फासू, असा इशारा
दिला आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारीही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. यात माजी मंत्री व यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे यांचा समावेश आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकूम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा दोडतले यांनी दिला आहे. 6 सप्टेंबरपासून हे उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आता धनगर समाजाने आंदोलन सुरू केल्याने राज्य सरकारच्या अडचणी
वाढणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर
आंदोलने सुरूच
आजही अनेक जिल्ह्यांत सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती. अकोला शहर व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सर्व राजकीय पक्ष, संघटना व संस्थांनी पाठिंबा दर्शवला होता. याशिवाय शाळा महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, किराणा बाजार असोसिएशन, व्यापारी आडतीया संघटना, सराफा व्यावसायिक, धान्य मर्चंट असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, अकोला बार असोसिएशन, आय. एम. ए. अकोला, बांधकाम व्यावसायिक संघटना, इंजिनिअर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन इत्यादी सर्व संघटना यांनी या बंदला पाठिंबा दिला. जालन्यातील मारुती भाऊसाहेब वाडेकर या वकिलाने आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी वेळीच त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. जालना पोलिसांनी वाडेकर यांना ताब्यात घेतले. मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले विलास यांची प्रकृती आज चिंताजनक झाली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार असे, विलास यांनी सांगितले.
‘ओबीसी’तून आरक्षणास
क्रांती मोर्चाचा विरोध!
मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक संजय मते यांनी हा इशारा दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या निर्णयाला आधीच विरोध केला आहे.
मराठा आंदोलन सुरूच! धनगरही एकवटले आरक्षण द्या! मंत्र्यांवर भंडारा उधळला
