मराठवाड्यातील पहिली आईच्या दुधाची बँक

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक साकारण्यात आली आहे. महिनाभरात ही मानवी दूध बँक म्हणजेच लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट सुरु होईल. यासाठी रोटरी क्लबचे सहकार्य मिळाले आहे. आईचे दूध म्हणजे नवजात शिशूसाठी अमृतच मानले जाते. मात्र, दुर्दैवाने अनेक तान्हूल्यांना काही कारणास्तव आईचे दूध मिळत नाही. मात्र, आता या मानवी बँकेमुळे अशा बाळांना दूध मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही मानवी दुधाची बँक सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी १ जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. जन्मानंतर सुरुवातीचे सहा महिने बाळाला आईचे दूधच दिले जाते. घाटी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दरवर्षी ३,००० ते ३,५०० अत्यवस्थ नवजात बालकांवर उपचार केले जातात. प्रसूतिशास्त्र विभागात दररोज ६०-७० प्रसूती होतात. त्यातील दररोज १० ते १२ नवजात शिशू या विभागात दाखल होतात. प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसे दूध नसते तर काहींना उपचारामुळे बाळाला दूध पाजता येत नाही. अशावेळी बाळांना आईचेच दूध मिळावे, यादृष्टीने ‘ह्युमन मिल्क बँक’ साकारण्यात आली. यात आईचे दूध संकलित करून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून ते गरजू शिशूंना दिले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top