नवी दिल्ली – दिल्ली महानगरपालिकेच्या एका मृत सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनी विमा परताव्यासाठी केलेले दोन दावे तांत्रिक मुद्यावर फेटाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) आणि दिल्ली महानगरपालिकेला दोषी ठरवून संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ४० हजार रुपये दंडासह भरणा झालेली रक्कम वार्षिक नऊ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश दिले.जोगिंदर कुमार असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.जोगिंदर कुमार दिल्ली महानगरपालिकेच्या करोलबाग विभागात काम करीत होता. १३ ऑक्टोबर रोजी त्याचे निधन झाले. तत्पूर्वी त्याने एलआयसीच्या दोन जीवनविमा योजनांमध्ये (पॉलिसी)पैसे गुंतवले होते.विम्याची एकत्रित रक्कम पाच लाख रुपये होती.जोगिंदरच्या पत्नी आणि मुलीने त्याच्या मृत्यूपश्चात एलआयसीकडे दोन दावे दाखल केले होते. मात्र जोगिंदरने दोन्ही पॉलिसींचे हफ्ते अर्धवट भरले होते. त्यामुळे त्या पॉलिसी बंद झाल्याचे सांगत एलआयसीने परतावा देण्यास नकार दिला. मात्र पॉलिसीचे हफ्ते जोगिंदरच्या वेतनातून एलआयसीकडे वळते करण्याची जबाबदारी दिल्ली महानगरपालिकेची होती. हफ्ते नियमित भरले जात आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी एलआयसीची होती,असे म्हणत जिल्हा ग्राहक न्यायालयाने एलआयसी आणि दिल्ली महानगरपालिकेला दोषी ठरविले. दोन्ही पॉलिसींची भरणा झालेली रक्कम वार्षिक ९ टक्के व्याजदराने जोगिंदरच्या कुटुंबियांना द्यावी,असे आदेश दिले. त्याबरोबर दावे फेटाळून मयताच्या कुटुंबियांना मानसिक,आर्थिक त्रास दिल्याबद्दल नुकसान भरपाई पोटी आणखी ४० हजार रुपये कुटुंबियांना द्यावे,असेही न्यायालयाने सांगितले.