कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून ११ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. त्यांच्या सोबत बंगालचे मुख्य सचिव एच के द्विवेदी आणि कोलकाता फुटबॉल क्लब मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहमेडन स्पोर्टिंगचे वरिष्ठ अधिकारीही परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी स्पेन आणि दुबई या देशांना भेट देणार आहेत. ममता बॅनर्जींचा आज दुबईत मुक्काम होता. बुधवारी सकाळी त्या स्पेनची राजधानी माद्रिदला जाणार आहेत. तिथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय बिझनेस समिटमध्ये त्या सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय बिझनेस समिटनंतर ममता बार्सिलोनामधील बंगाल ग्लोबल बिझनेस समिटच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या हा परदेश दौरा राज्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असे सांगितले जात आहे. परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी ममतांनी बंगालच्या जनतेला त्यांच्या अनुपस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली आहे.
ममता बॅनर्जी आजपासून ११ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर
