चंदीगड: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन पदव्युत्तर संस्थेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ वरील रेडिओ कार्यक्रमाच्या १०० व्या भागाच्या प्रसारणाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात सहभागी न झाल्यामुळे संस्थेच्या ३६ विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थिनींना एका आठवड्यासाठी वसतिगृह सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाने ३० एप्रिल रोजी संस्थेत प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रथम आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना ऐकणे बंधनकारक केले होते. मात्र, प्रथम वर्षाला शिकणाऱ्या २८ आणि तृतीय वर्षाला शिकणाऱ्या आठ अशा एकूण ३६ विद्यार्थिनी या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने ३ मे रोजी आदेश जारी करून विद्यार्थिनींना आठवडाभर वसतिगृहातून बाहेर पडू दिले जाणार नसल्याची शिक्षा सुनावण्यात आली.