मनोरा पुनर्विकास ‘एल अँड टी’कडे महिनाभरात कामाचा शुभारंभ

मुंबई :

नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवास पुनर्विकासासाठीची निविदा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून अंतिम करण्यात आली. एल अँड टी या समूहाला पुनर्विकासाचे काम देण्यात आले आहे. निविदा अंतिम झाल्याने आता कार्यादेश काढून महिन्याभरात कामाला सुरुवात करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. काम सुरू झाल्यापासून पुढील चार वर्षांत काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचा निश्चय आहे.

राज्यातील आमदारांच्या निवासासाठी १९९४ मध्ये बांधण्यात आलेली १४ मजली मनोरा आमदार निवासाची इमारत अतिधोकादायक झाली आहे. या इमारतीचा काही भाग २०१७ मध्ये कोसळला. त्यानंतर ही इमारत रिकामी करून २०१९ मध्ये पाडण्यात आली. यांनतर मनोराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) कडे पुनर्विकास सोपविण्यात आला. मात्र सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने एनबीसीसीकडून पुनर्विकास काढून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवला. त्यानंतर बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली. दोनदा निविदेला प्रतिसाद मिळाला नाही पण तिसऱ्यांदा मात्र दोन निविदा सादर झाल्या. एल अँड टी आणि शापूरजी-पालनजीच्या या निविदा होत्या. आर्थिक निविदा उघडण्यात आल्या तेव्हा मात्र एकमेव एल अँड टीनेच आर्थिक निविदा सादर केली. तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्याने एक निविदा सादर झाली तरी ती अंतिम करता येत असल्याने बांधकाम विभागाने कंत्राट अंतिम करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठविला होता. अखेर या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top