पॅरिस -पॅरिस ऑलिंम्पिक मध्ये काल १० मीटर एअरपिस्टल स्पर्धेत २२१. ७ गुण घेऊन कांस्य पदक पटकावणारी भारतीय नेमबाज मनू भाकरने आज मिश्र दुहेरीच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेतही कांस्य पदक जिंकून डबल धमाका केला. तिच्या या कामगिरीबद्दल पुन्हा एकदा देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे . आज कांस्यपदकासाठी मनू भाकर व सरबज्योत या भारतीय जोडीचा कोरियन जोडी ली वॉन-हो आणि ओ ये-जिन यांच्याशी सामना झाला. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. सरबज्योतने ८.६ तर मनू १०.४ गुण घेत पिछाडीवर राहिले. मात्र त्यानंतर दोघांनी दमदार पुनरागमन केले. सलग चार शॉट्समध्ये दोघांचेही गुण अग्रस्थानी राहत ८-४ अशी आघाडी घेतली. यानंतर पाचव्या मालिकेत मनू भाकरने १० .६ गुण घेत निर्णायक आघाडीकडे वाटचाल केली. यानंतर भारतीय जोडीने १४-१० अशी निर्णायक आघाडी घेत कांस्य पदकावर आपली मोहर उमटवली.एकाच ऑलिंम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.