नवी दिल्ली: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १ जूनपर्यंत वाढ केली आहे. तुरुंगात त्यांना काही पुस्तकांसह खुर्ची आणि टेबल देण्याचा विचार करण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी तुरुंग प्रशासनाला दिले.
अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी, दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया आणि इतर तिघांविरुद्ध सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रावरील आपला आदेश राखून ठेवला होता. सिसोदियाशिवाय अर्जुन पांडे, बुची बाबू गोरंटला आणि अमनदीप ढल यांचीही आरोपपत्रात नावे आहेत.
मनीष सिसोदिया यांना हजर केले जाते, तेव्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते न्यायालयाबाहेर निदर्शने करतात. राऊस एव्हेन्यू न्यायालयाबाहेरही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. मनीष सिसोदिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या गेल्या . दिल्ली पोलिसांनी न्यायालयाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. न्यायालयाच्या आवाराबाहेर दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याशिवाय निमलष्करी दलही येथे तैनात करण्यात आले होते.