मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा बदलत विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा स्वबळावर लढून मनसेचे आमदार होणारच अशी घोषणा केली.
आज रंगशारदा येथे पदाधिकार्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले कॅनडा आणि अमेरिका दरम्यान पाच मोठे तलाव आहेत. त्यात नायगरा धबधबा हा अगदी छोटा दिसतो. इतके मुबलक पाणी असून कागदाने पुसतात. आपल्याकडे पाणी नसताना आपण बेफाट पाणी वापरतो. आपण यात बदल करायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे. या देशात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. आपल्या धर्माकडे पाहणे गरजेचे आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडे वापरतात त्यासाठी सर्वात जास्त झाडांचा वापर होतो. होळीला लाकडे तोडतो. या काही परंपरा बदलायला हव्या. आपल्याकडे विद्युतदाहिन्यांची संख्या
वाढवली पाहिजे.
आरोग्य, नोकरी, हे मूलभूत विषय सोडून आपल्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ सुरू आहे. दोघे एकत्र आले असते तर पक्ष टिकले असते. या योजनांसाठी पैसे आहेत का? खड्डे भरायला पैसे नाहीत. एकमेकांना शिव्या द्यायच्या, लक्ष विचलीत करायचे आणि निवडणुका करायच्या हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील मतदारसंघ पाहताना कोण कुठच्या पक्षात आहे ते बघायला लागते. विधानसभा निवडणुकीवेळी या सर्व राजकीय पक्षात जे घमासान होईल ते न भूतो असे असेल. माझ्या पक्षातील काही तिकडे जाणार म्हणतात. जो माझ्या पक्षातून जाईल त्याचा सत्यानाशच होईल. त्यांचा त्यांनाच पत्ता नाही आपल्या पक्षातील कशाला घेतील? ते शेवटी म्हणाले की, मी पक्षात जिल्हानिहाय टीम करून सर्व्हे करून घेतला. आता ते पुन्हा जातील तेव्हा पदाधिकार्यांना भेटतील. त्यावेळी त्यांना सर्व सांगा. जी माहिती आहे नी प्रामाणिकपणे द्या. मला येणार्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत. ती गोष्ट घडणार म्हणजे घडणारच आहे. आपण 225 ते 250 जागा लढविणार आहोत. युती होईल की नाही याचा कसलाही विचार करू नका. 1 ऑगस्टपासून मी दौरा सुरू
करीत आहे.
महायुतीलाच छुपा पाठिंबा
राज ठाकरे हे आजच्या भाषणात महायुतीच्या योजनांवर टीका करून स्वबळाची भाषा करीत असले तरी त्यांची ही व्यूहरचना महायुतीला छुपा पाठिंबा देणारीच आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत झाली तर महायुती मोठ्या संकटात येईल हे उघड सत्य आहे. यामुळे आपण महायुतीच्या विरोधात आहोत असे दाखवायचे आणि त्यातून महाआघाडीला मिळणारी मते खायची अशी रचना आहे. महाआघाडीची मते खाल्ली की महायुतीचा उमेदवार निवडून येईल असे नियोजन आहे. त्यामुळे निवडणूक लढवायला पैसा नाही आणि उमेदवारही नाहीत असे गेल्या निवडणुकीवेळी म्हणणारे राज ठाकरे यावेळी थेट 225 ते 250 जागा लढविण्याची भाषा
करीत आहेत.