भोपाळ – मध्य प्रदेशातील जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयांवर काल ईडीने छापे मारले असून कंपनीमध्ये ७३ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यानंतर या कंपनीचे संचालक किशन मोदी यांची पत्नी पायल मोदी यांनी विषप्राशन केले. त्यांच्यावर भोपाळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी विषप्राशनाआधी लिहिलेल्या चिठ्ठीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान व अन्य पाच जणांवर गंभीर आरोप केले आहेत.
ईडीने काल कपंनीच्या भोपाळ, सीहोर व मुरैना परिसरात छापे टाकले. या छाप्यात ७३ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. कंपनी व कंपनीच्या संचालकाच्या निवासस्थानी टाकलेल्या या छाप्यांमध्ये अनेक बनावट कागदपत्रे, २५ लाख रुपये रोख, बीएमडब्लू व फॉरच्युनर सारख्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जयश्री व गायत्री फूड प्रॉडक्ट भेसळयुक्त दुग्धजन्य उत्पादने तयार करत असून ते देशात व परदेशात विकत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असून कंपनीने अनेक बनावट प्रमाणपत्रेही मिळवल्याचे ईडीने म्हटले आहे.
पायल मोदी यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान व त्यांच्या इतर ५ साथीदारांची नावे असून त्यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करुन कंपनीवर सातत्याने जीएसटी, अन्न प्रशासन व ईडी आदीच्या माध्यमातून कंपनीवर धाडी मारल्या जात असल्याचा आरोप केला आहे.